स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक : चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार

स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक : चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार
भाजप उमेदवाराने मतदारांशी संपर्क साधला नसल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत निर्णयाची घोषणा
चाळीसगाव, प्रतिनिधी : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
चाळीसगाव येथील राजगड परिसरातील स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक तसेच अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अपक्ष नगरसेविका सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने मतदारांपर्यंत येऊन साधा मतांचा आग्रहही केला नसल्याचा आरोप केला. “मतदारांशी संपर्क न साधणाऱ्या उमेदवाराला मत कसे द्यायचे?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
तसेच निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने लोकशाही प्रक्रियेची थट्टा झाल्याची भावना व्यक्त करत बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि रोशन जाधव यांनी सांगितले.
या निर्णयामुळे चाळीसगाव मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी जिल्ह्यात सर्वात कमी राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.




