घरकुल योजनेतील कथित ५९ कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा

घरकुल योजनेतील कथित ५९ कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा
तत्कालीन ४८ नगरसेवकांवर कारवाईची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
तत्कालीन नगरपालिकेच्या ४८ नगरसेवकांनी संगनमताने घरकुल योजना राबविताना विविध नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेने कोणताही ठराव मंजूर न करता तसेच आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता न घेता घरकुल योजना राबविली. योजनेसाठी नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही आर्थिक तरतूद नसतानाही कामे करण्यात आली. स्थानिक निधी लेखा विभागाच्या विशेष लेखापरीक्षण अहवालासह विविध प्रशासकीय आदेशांमध्ये या योजनेतील अनियमितता नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी १७ मार्च २००६ रोजी घरकुल योजनेचे बांधकाम बेकायदेशीर ठरविले होते. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात आरक्षित जागेवर उभारण्यात आलेली घरकुले नियमबाह्य व अनधिकृत असल्याचे नमूद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
संपूर्ण योजना बेकायदेशीर ठरल्याने योजनेसाठी हुडकोकडून प्राप्त झालेली सुमारे ५९ कोटी रुपयांची रक्कम वसुलीस पात्र असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निधीच्या वापराबाबत तत्कालीन ४८ नगरसेवकांची सामूहिक जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, प्रत्येकी सुमारे १ कोटी १६ लाख रुपयांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





