इतर

ड्रॉप केस’च्या साम्राज्यावर जळगाव पोलिसांचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

ड्रॉप केस’च्या साम्राज्यावर जळगाव पोलिसांचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

मुक्ताईनगरातील पाच गावांवर पहाटेचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; २० लाखांची रोकड, ३८ लाखांचे दागिने, गावठी कट्टे, वन्यजीव कातडीसह मोठा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

‘ड्रॉप केस’साठी कुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांवर जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अभूतपूर्व धाडसत्र राबवत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ हे विशेष अभियान यशस्वी केले. जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि नियोजनबद्ध मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या कारवाईत शेकडो पोलिसांनी एकाचवेळी गावांमध्ये प्रवेश करून संशयित व सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.

सोशल मीडियातून देशभरात जाळे

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गावे अनेक वर्षांपासून फसवणूक, दरोडे आणि लुटमारीच्या गुन्ह्यांसाठी चर्चेत आहेत. अल्प लोकसंख्या असूनही सोशल मीडियावर काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख व डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ड्रॉप केस’ची धक्कादायक पद्धत

या व्हिडिओंना भुलून गावात येणाऱ्या नागरिकांना बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेकांना थेट लुटले जाते तर विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. काही प्रकरणांमध्ये पीडितांच्या जवळ हरणाचे किंवा वाघाचे बनावट कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ तयार केले जातात आणि वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तक्रार करण्यापासून परावृत्त केले जाते. या संपूर्ण प्रकाराला पोलिसांच्या भाषेत ‘ड्रॉप केस’ म्हटले जाते.

गुन्ह्यांची गंभीर पार्श्वभूमी

मागील तीन वर्षांत या परिसरात १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणुकीचे गुन्हे, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी नोकरांवरील हल्ल्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या भागाकडे पोलिसांचे विशेष लक्ष होते.

गुन्हे दाखल; आरोपी ताब्यात

या कारवाईदरम्यान फरेज राजू पवार, रामजाने राईसाहेब भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, रोहित सुदेश पवार यांच्यासह विविध आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विलास नरविलाल पवार व अजय दादा पवार या पाहिजे आरोपींनाही अटक करण्यात आली.

मोठा मुद्देमाल जप्त

कारवाईत एकूण २० लाख रुपयांची रोकड, अंदाजे ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरणाचे, कोल्ह्याचे व सशाचे कातडे, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याशिवाय संशयास्पद स्वरूपाचा इतर मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

२०० पोलिसांचा सहभाग

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तथा मुक्ताईनगरचे प्रभारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख, अमितकुमार बागुल यांच्यासह सुमारे २०० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

निर्णायक पाऊल

अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सातत्याने समोर येणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ‘ड्रॉप केस’सारख्या संघटित फसवणूक रॅकेटविरोधातील ही कारवाई भविष्यातील मोहिमांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button