भाजपचा नवा कर्णधार ठरणार उद्या! रविंद्र चव्हाण रिंगणात; फडणवीस-रिजिजू यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

भाजपचा नवा कर्णधार ठरणार उद्या! रविंद्र चव्हाण रिंगणात; फडणवीस-रिजिजू यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
मुंबई | प्रतिनिधी राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असतानाच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रीपद भूषवू लागल्यानंतर हे पद रिक्त झाले असून, अखेर नव्या नावाचा पडदा हटण्याची वेळ जवळ आली आहे.
आज या पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांनी अधिकृत अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, हा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत दाखल झाला. त्यामुळे चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
फडणवीसांनी यावेळी सांगितले की, “रविंद्र चव्हाण यांनी युवामोर्चाच्या कार्यकर्त्यापासून नगरसेवक, आमदार आणि आता कार्याध्यक्ष म्हणून अतिशय दमदार कारकीर्द घडवली आहे. त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमतेमुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदावर असताना संघटनेचं उत्तम नेटकेपणानं बांधकाम केलं. त्याचा सकारात्मक परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. आता ही धुरा चव्हाण यांच्या खांद्यावर सोपवली जात आहे.”
या राजकीय दावपेचांमधून उद्या संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर अखेरचा शिक्का बसणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या सगळ्यांच्या नजरा भाजपच्या ‘नवे कप्तान कोण?’ या प्रश्नावर खिळल्या आहेत!