फहीम कौसर यांच्या सन्मानार्थ चोपड्यात भव्य काव्य मैफल

फहीम कौसर यांच्या सन्मानार्थ चोपड्यात भव्य काव्य मैफल
नामवंत कवींनी सादर केल्या उत्कृष्ट रचना; साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
चोपडा, प्रतिनिधी : येथील के.जी.एन. कॉलनीत प्रसिद्ध कवी व साहित्यिक व्यक्तिमत्त्व फहीम कौसर यांच्या सन्मानार्थ भव्य काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील साहित्यप्रेमी, काव्यरसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात काव्यरसिकांना दर्जेदार साहित्यिक मेजवानी अनुभवायला मिळाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून फहीम कौसर यांनी शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूलचे प्राचार्य शेख अब्दुल हक शेख अयूब होते, तर सय्यद आबिद मीर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शेख सिराज दानिश, मोहम्मद खान, शब्बीरभाई (मिलाप कोल्डड्रिंक), असलम खान सर, शेख हारून उर्फ कालू भाई, सय्यद वाहिद अली, अलीमुद्दीन हेल्पर, हाफिज सलीम, हाफिज अश्रफ, हाफिज इसहाक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काव्य मैफलीत अश्फाक निजामी, नदिम मिर्झा, फहीम कौसर, प्रा. इमरान फारिस, जमीर अडावदी, इमरान साहिल, युनूस अंजर, गुलाम सरवर, आसिफ अन्वर, अम्मार हैदर, दिलबर मुस्तफा आबादी आणि सकलैन संजर या कवींनी आपल्या प्रभावी काव्यरचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक काव्य सादरीकरणाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन साबिर मुस्तफा आबादी यांनी केले. युनूस अंजर मुस्तफा आबादी (संयोजक), अम्मार हैदर आणि इकबाल खान रमजान खान तडवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी इकबाल खान तडवी यांनी उपस्थित मान्यवर, कवी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांचे आभार मानले. भविष्यातही अशाच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.





