
अपक्ष आमदार गोकुळ गीते यांची शिवसेनेला साथ; ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करण्याची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवलेले आमदार गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भविष्यात शिवसेनेचे ‘सहयोगी सदस्य’ म्हणून कार्य करण्याची घोषणा केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
यावेळी गोकुळ गीते म्हणाले की, राज्यात विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. राज्यातील विकासकामे, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणारे विविध निर्णय तसेच पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली गुंतवणूक यामुळे शिवसेनेकडे अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आकर्षित होत आहेत.
शिवसेनेच्या विचारधारेसोबत राहून संघटना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा निर्धारही गोकुळ गीते यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला मंत्री उदय सामंत, आमदार किशोर पाटील, शिवसेना उपनेते चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार राहुल शेवाळे, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, माजी खासदार उन्मेष पाटील तसेच स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





