
टीईटीचा पेपर फुटला; उद्याची परीक्षा रद्द, राज्यभर खळबळ
पहिले NEET, आता TET; महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या प्रकारानंतर पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर होताच राज्यभरातील लाखो परीक्षार्थींमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात 1,028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (दि. 27 जून) पहाटे भिवंडी येथे काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.
तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तींकडे असलेले काही प्रश्न हे टीईटी जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
घटनेची गंभीरता लक्षात घेता शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनेच पार पडावी, यासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
NEET नंतर पुन्हा महाराष्ट्र हादरला
काही दिवसांपूर्वी NEET परीक्षेच्या कथित पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकरणातही महाराष्ट्रातील काही आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर आता टीईटीच्या पेपरफुटीची घटना उघडकीस आल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुढील परीक्षेची तारीख आणि अन्य अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.




