स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी गंभीर; TET प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, काँग्रेसची मागणी

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी गंभीर; TET प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, काँग्रेसची मागणी
जळगाव, दि. 29 : देशातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, NEET-UG 2026 मधील गैरप्रकारांनंतर आता राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, NEET-UG 2026 परीक्षेसाठी देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले होते. अनेक कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, कर्ज काढले आणि आयुष्यभराची बचत खर्च केली. मात्र पेपरफुटीच्या संशयामुळे परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची वेळ येणे ही संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
2024 मधील NEET वादानंतर परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही 2026 मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील TET परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असून, शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारांना काँग्रेस पक्ष सहन करणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने शासनाकडे TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई, राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्याधुनिक व पारदर्शक यंत्रणा उभारणे, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक व आर्थिक परिणामांचा अभ्यास करून सहाय्य व्यवस्था निर्माण करणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचे नियमित स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, परिश्रमाचे आणि समान संधीच्या तत्त्वाचे संरक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी असून, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही धनंजय चौधरी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जामील शेख, मनोज वाणी, कफील अहमद, युवक काँग्रेसचे सदस्य अनंत पाटील, मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन झांके तसेच एनएसयूआयचे विवेक सपकाळे उपस्थित होते.





