क्रिकेट सामना पाहून परतताना क्रुझर ट्रकला धडकली;

क्रिकेट सामना पाहून परतताना क्रुझर ट्रकला धडकली;
बोदवडचे दोन मुले ठार, ११ जखमी
नेवासा ( प्रतिनिधी) :
अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी (दि. ९ जून) पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बोदवड तालुक्यातील दोन युवकांचा मृत्यू, तर ११ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
क्रिकेट पाहून परतत होते बोदवडचे विद्यार्थी
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील ‘केसरी स्पोर्ट्स अकॅडमी’तील १३ विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथे आयोजित एमपीएल (MPL) क्रिकेट सामना पाहण्यासाठी रविवारी गेले होते. सामना आटोपून रात्री उशिरा हे विद्यार्थी क्रुझर वाहनाने बोदवडकडे परतत असताना, नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या वाहनाने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रथमेश तेली (रा. बोदवड) याचा जागीच मृत्यू झाला. तर वृषभ सोनवणे (रा. बोदवड) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात इतर ११ विद्यार्थी जखमी झाले असून, नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ॲम्बुलन्सच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.