जळगावात ईद उल अझहा (बकरी ईद ) उत्साहात ; वक्फ कायदा रद्द करा आणि विश्वशांतीसाठी दुआचे आवाहन

जळगावात ईद उल अझहा (बकरी ईद ) उत्साहात ; वक्फ कायदा रद्द करा आणि विश्वशांतीसाठी दुआचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी :
ईद उल अझहा (बकरी ईद) निमित्त अजिंठा चौक येथील मुस्लिम इदगाह मैदानावर शनिवारी सकाळी ७.१५ वाजता नमाज पठण करण्यात आले. मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. अरबी भाषेत प्रवचनानंतर मौलानांनी विश्वबंधुत्व, त्याग आणि अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी विशेष दुआ केली. “हे अल्लाह, आम्हा सर्व मानवजातीला तुझ्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दे व विश्वशांती लाभू दे,” अशी प्रार्थना करण्यात आली. हजारो उपस्थितांनी “आमीन” म्हणत या दुआला प्रतिसाद दिला.
मौलाना पटेल यांचे आवाहन : वक्फ कायदा रद्द करा, मस्जिद ए अक्सासाठी प्रार्थना करा
उर्दू भाषेत प्रवचन करताना मौलाना कलीम पटेल यांनी ईद उल अझहाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व सांगताना प्रेषित इब्राहिम व इस्माईल यांच्या बलिदानाचा संदर्भ दिला. “त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या या दिवशी, सरकारकडून वक्फ कायद्याच्या माध्यमातून आमच्याकडून मस्जिद, मदारिस, कब्रस्तान हिरावून घेतले जात आहेत, त्यासाठी प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.
तसेच, “संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. विशेषतः फलिस्तीनमधील मस्जिद ए अक्सा परिसरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मानवतेवर गदा येत आहे. ही हिंसा थांबावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी,” असे आवाहन मौलाना पटेल यांनी उपस्थितांना केले.
ईदगाह मैदानावरील कार्यक्रम सकाळी ८.३० वाजता संपन्न झाला. यानंतर उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला हजारोंचा जनसागर लोटला होता.