
परिस्थिती भविष्य ठरवत नाही; जिद्द, चिकाटी आणि मेहनतच भविष्य घडवते’ — पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधीत ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना ‘मदतीचा हात’; शिक्षणाच्या वाटेवर GPS परिवार भक्कमपणे पाठीशी’
पाळधी/जळगाव, दि. १७ : “परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही; जिद्द, चिकाटी आणि मेहनत परिस्थितीवर मात करून भविष्य घडवते. गरिबी ही शिक्षणाच्या वाटेतील अडचण असू शकते; मात्र ती विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची मर्यादा ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही निराधार समजू नये. त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर माझ्यासह संपूर्ण GPS परिवार भक्कमपणे पाठीशी उभा आहे,” असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
पळधी येथील सुगोकी रिसॉर्ट येथे आयोजित ‘मदतीचा हात’ उपक्रमात ते बोलत होते. GPS मित्र परिवाराच्या पुढाकारातून, मनोजभाऊ चौधरी मित्र परिवार आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात जळगाव व धरणगाव तालुक्यातील ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, बूट-चप्पल, पाण्याची बाटली व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, “आमची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली आहे. गरिबीचे चटके आणि संघर्ष काय असतो, हे आयुष्य मी स्वतः जगलो आहे. आई-वडिलांची माया आणि त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही. मात्र परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि त्याचे स्वप्न अधुरे राहू नये. आज माझ्यासमोर ७९२ विद्यार्थी नव्हे, तर उद्याची ७९२ स्वप्ने आहेत. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, अभियंते, सैनिक, उद्योजक आणि कर्तृत्ववान नागरिक घडतील.”विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा न्यूनगंड मनात बाळगू नये. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व प्रामाणिक मेहनतीची साथ सोडू नये, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक अनाथ आणि १० हजारांपेक्षा अधिक एकल पालकांची मुले असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत अनाथ प्रमाणपत्र आणि बालसंगोपन योजनेशी संबंधित प्रक्रिया डिजिटल करण्याचा प्रयत्न असून, एकल महिलांसाठी महिला उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उद्योग उभारणी, उत्पादन, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निराधार बालकांना आधार… ज्येष्ठांना सन्मानाचे छत्र!
अनाथाश्रम व वृद्धाश्रम उभारण्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मानस
समाजातील निराधार बालकांना सुरक्षित आधार मिळावा आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मानाने जगण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे, यासाठी अनाथाश्रम व वृद्धाश्रम उभारण्याचा मानस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त करत सांगितले की, “आई-वडिलांची माया आणि त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही; मात्र आधाराची गरज असलेल्या बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना समाजाने एकटे पडू देता कामा नये,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्धीसाठी नव्हे, सामाजिक बांधिलकीतून — प्रतापराव पाटील
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. “GPS परिवाराचे उपक्रम प्रसिद्धीसाठी नसून समाजातील गरजू व उपेक्षित घटक संधींपासून वंचित राहू नयेत, या भावनेतून राबविले जातात. ‘मदतीचा हात’ हा केवळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला आधार देण्याचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण पाटील यांनी केले, तर आभार GPS संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परिस्थितीसमोर न खचता शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रशासन आणि सामाजिक संस्था पाठीशी उभ्या आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला बाल विकास विभाग शून्य ते अठरा वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हा महिला बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी केले. आत्ता पर्यंत 8000 मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ दिला आहे. व 600 पेक्षा जास्त मुलांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप केले आहे तसेच आता भविष्यवेधी दृष्टिकोन घेऊन ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मानस आहे असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक एकल महिलांसाठी पण उद्योजकता केंद्र स्थापन करण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रयत्न सुरू आहे अशी माहिती दिली.
सहा वर्षांच्या ‘माऊली महाराजां’च्या गवळणीने उपस्थित मंत्रमुग्ध
कार्यक्रमात चिंचपुरा येथील अवघ्या सहा वर्षांच्या ईयांश पाटील ऊर्फ ‘माऊली महाराज’ या बालकाने आपल्या मधुर आवाजात गवळण सादर केली. त्याच्या सुरेल सादरीकरणाने मान्यवरांसह उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. बालवयातील त्याच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी माजी उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, रोटरी क्लबचे सचिव धनराज कासट, पुनीत तलरेजा, मुकुंदराव नन्नवरे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, शेतकरी संघाचे सभापती शरद पाटील, जितेंद्र पाटील, डॉ. कमलाकर पाटील, साहेबराव वराडे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा, मंगलअण्णा पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी, GPS परिवाराचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




