खान्देशजळगांवसामाजिक

गणेशोत्सवातील उत्कृष्ट आरास, विसर्जन मिरवणुकीचा गौरव

गणेशोत्सवातील उत्कृष्ट आरास, विसर्जन मिरवणुकीचा गौरव

आझाद क्रीडा मंडळ आरासीत प्रथम; शनिपेठ मित्र मंडळाने पटकावला विसर्जन मिरवणुकीचा मान

जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दल आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे आयोजित गणेश मंडळांच्या आरास व विसर्जन मिरवणूक स्पर्धेतील विजेत्यांचा बुधवारी (दि. ३०) सायंकाळी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात गौरव करण्यात आला. आरास स्पर्धेत आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर विसर्जन मिरवणूक स्पर्धेत शनिपेठ मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शहरातील विविध गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच जनजागृतीपर संदेश देणाऱ्या आकर्षक आरास साकारल्या होत्या.

आरास स्पर्धेत आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाला प्रथम, जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाला द्वितीय, तर दीक्षित वाडी मित्र मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ पुरस्कार वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ, जिद्दी मित्र मंडळ आणि बालाजी पेठ मित्र मंडळाला देण्यात आला. गडकिल्ल्यांची आकर्षक आरास साकारल्याबद्दल शनिपेठ मित्र मंडळातील महेश पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विसर्जन मिरवणूक स्पर्धेत शनिपेठ मित्र मंडळाने प्रथम, जय गणेश मित्र मंडळाने द्वितीय, तर न्यू अचानक मित्र मंडळ, कांचननगर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शिवनेरी मित्र मंडळ, जोशी पेठ आणि बाबा सेवादास मित्र मंडळाला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

आरास स्पर्धेचे परीक्षण मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे, राजेश शिंपी, शरद भालेराव, किशोर सूर्यवंशी आणि सुनील दाभाडे यांनी केले. विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे परीक्षण उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, दीपक जोशी आणि राजेश शिंपी यांनी केले.

सायबर गुन्ह्यांवर जनजागृती करणाऱ्या मंडळाचा गौरव

जुना कापड बाजार, शिवाजी रोड मित्र मंडळातर्फे सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणारा देखावा साकारण्यात आला होता. या उपक्रमाची दखल घेत मंडळाचे अध्यक्ष शुभम विंचवेकर, उपाध्यक्ष नीतेश पानसर आणि सचिव अक्षय जैन यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

५० वर्षे पूर्ण करणाऱ्या मंडळांचा सन्मान

दरम्यान, शहरातील ५० वर्षांची परंपरा पूर्ण केलेल्या गणेश मंडळांचाही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये बाबा सेवादास मित्र मंडळ, मायक्का देवी मित्र मंडळ, दीपक तरुण मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र मंडळ, जिद्दी मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, युवा मारुती पेठ मित्र मंडळ, श्री गणेश शाहूनगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, शनिपेठ मित्र मंडळ, शिवभक्त मित्र मंडळ आणि जय सम्राट मित्र मंडळाचा समावेश होता.

गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक संदेश देणाऱ्या आरास, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा सन्मान करून पोलिस प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button