
बारावीनंतरची दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
इकरा शाहीन उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पालक मार्गदर्शन सभा उत्साहात
जळगाव : इकरा शाहीन उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मेहरूण, जळगाव येथे पालक मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, बारावीनंतरच्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या योग्य दिशेबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती हे कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रियाज शाह यांनी केले. त्यांनी पालकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत शाळा आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्युनिअर कॉलेजचे प्रभारी झाकीर सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे म्हणून आसिफ शाह, वसीम चौधरी आणि डॉ. हारून बशीर उपस्थित होते.
यावेळी डॉ. हारून बशीर यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, करिअरची निवड आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि उद्दिष्टांचा विचार करून पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आसिफ शाह यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून अभ्यास आणि भविष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत जागरूकता दाखविणाऱ्या पालकांचे त्यांनी कौतुक केले. पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार यांनी बदलत्या काळातील आव्हानांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच आवश्यक कौशल्ये आत्मसात करून तंत्रज्ञानाचा योग्य व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन केले. शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षेतील गुणांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चांगले संस्कार, जबाबदारीची जाणीव आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून वैयक्तिक प्रगतीसोबतच कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहैल अमीर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शगुफ्ता मॅडम, नाझमीन मॅडम, आणि इतर शिक्षक वी शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.




