खान्देशजळगांव

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान कार्यक्रम उत्साहात; प्रगत शेतकऱ्यांचा गौरव

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान कार्यक्रम उत्साहात; प्रगत शेतकऱ्यांचा गौरव

जळगाव, — : जळगाव हा कृषीप्रधान जिल्हा असून शेती क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. मात्र जमिनीचा पोत टिकवून ठेवत उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित शेतकरी सन्मान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा विहीर योजनेचे कार्यारंभ आदेश वितरित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी आणि खरीप हंगामात उल्लेखनीय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, सध्या एल-निनोचे संभाव्य परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी किमान ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. जिल्ह्यात बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. शेतीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी एकपिकीय पद्धतीऐवजी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भविष्यातील बदलत्या हवामानाचा विचार करून शाश्वत शेती पद्धती स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“जळगाव आपलं सगळ्यात पहिलं” या संकल्पनेप्रमाणे कृषी क्षेत्रातही जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी नेण्यासाठी शेतकरी आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी मांडलेल्या हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध, सक्षम आणि तंत्रज्ञानाच्या वापरात स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पादनवाढीसह शेती अधिक सक्षम होईल. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी प्रास्ताविकातून कृषी दिनाचे महत्त्व विषद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button