खान्देशगुन्हेजळगांव

धरणगावातील घरफोडीचा उलगडा; दोन आरोपी अटकेत, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चोरीतील ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

धरणगावातील घरफोडीचा उलगडा; दोन आरोपी अटकेत, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चोरीतील ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव | प्रतिनिधी

धरणगाव शहरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीतील ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी आपल्या कुटुंबासह २३ मार्च २०२६ रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ३१ मार्च रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप थोरात (वय २६) व कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०), दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव, यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले.कसून चौकशीत तिघांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली, तर विधिसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

रोख रक्कम ६२ हजार रुपये, ८९ ग्रॅम वजनाची चांदीची लगड किंमत ३ हजार रुपये, ३.१२० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड किंमत १० हजार रुपये, असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button