
मागील दरवाजा उघडा राहिला अन् चोरट्यांनी ८० हजार लांबवले; देशमुखवाडीतील घरफोडी
पाचोरा पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी): शहरात दिवसाढवळ्या घरफोडीचे सत्र सुरूच असून, देशमुखवाडी परिसरात मागील दरवाजा उघडा असण्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अशी घडली घटना
पाचोरा येथील देशमुखवाडीत राहणारे गणेश धुडकू भोई (वय ४८) यांच्या घरात ४ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. घराच्या मागील बाजूचा दरवाजा काही कारणास्तव उघडा राहिला होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटात हात घालून सोन्याचे कॉईन व रोख रक्कम चोरून पोबारा केला. चोरट्यांनी एकूण ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉईन आणि ५० हजार रुपये रोख असा ८० हजारांचा मुद्देमाल चोरला. पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.





