
मालमत्तेच्या वादातून भावजयीची हत्या करणाऱ्या दिराला जन्मठेप
जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल : अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची
जळगाव : मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादातून भावजयीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी सख्ख्या दिराला जळगाव जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिपक लोटन सोनार असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनी येथे राहणाऱ्या मृत योगिता मुकेश सोनार आणि त्यांचा दीर दिपक लोटन सोनार यांच्यात मालमत्तेच्या कागदपत्रांवरून वाद सुरू होता. २१ मे २०२२ रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा वाद अचानक विकोपाला गेला. रागाच्या भरात दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी हत्यार घटनास्थळी फेकून तेथून पसार झाला होता.
१७ साक्षीदारांची तपासणी
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासले. यामध्ये मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची प्रत्यक्षदर्शी साक्ष खटल्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व निर्णायक ठरली.
तसेच पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांची साक्ष व त्यांनी सादर केलेले तांत्रिक पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. सर्व पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी दिपक सोनार याला भादंवि ३०२ (हत्या) अन्वये दोषी ठरवत जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.





