खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलविल्यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा

खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलविल्यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा
गंभीर अवस्थेतील महिलेला आरोग्यदूत पै.शिवाजी पाटील यांची मदत
जामनेर : तालुक्यातील सुनसगाव येथील एका महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. संबंधित महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगत ऑक्सिजनसह उपचारांचा खर्च मोठा होईल आणि जीवाची शाश्वती नसल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.
या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार अमोलदादा जावळे यांचे आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील यांनी संबंधित महिला व तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि महिलेवर पुढील उपचार योग्य पद्धतीने मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू केले.
शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था
यानंतर खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बेड उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिलेला आवश्यक असलेले प्रगत उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली.
शासकीय रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू झाल्यानंतर तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. उपचारादरम्यान तिचे दोन वेळा डायलिसिस करण्यात आले. गंभीर परिस्थितीत असलेल्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
कुटुंबीयांकडून आभार
गंभीर परिस्थितीत योग्य वेळी मदत आणि मार्गदर्शन मिळाल्याने महिलेला शासकीय रुग्णालयात उपचार मिळू शकले. आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महिलेवर वेळेत उपचार सुरू झाल्याबद्दल कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
“गंभीर परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता योग्य उपचारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गरजू रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.” — पैलवान शिवाजी पाटील, आरोग्यदूत





