
फलाटांची सुविधा वाढली, तरी गाड्या ‘आऊटर’वरच; प्रवाशांचा खोळंबा कायम
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकाचा कोट्यवधी रुपये खर्च करून कायापालट करण्यात आला आहे. सहा फलाटांसह सरकते जिने, लिफ्ट, प्रशस्त प्रतीक्षालय आणि डिजिटल माहिती प्रणाली अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषतः सुरत मार्गावरील गाड्यांसाठी ५ आणि ६ क्रमांकाचे फलाटही सुविधांसह तयार करण्यात आले आहेत. मात्र, सुरतकडून जळगावकडे येणाऱ्या काही गाड्या स्थानकात न घेता ‘आऊटर’वर बराच वेळ थांबवल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक खोळंबा सहन करावा लागत आहे.
आधुनिक स्थानक, मात्र गाड्यांना ‘आऊटर’चा अडथळा
जळगाव रेल्वे स्थानकावर आता एकाच वेळी अनेक गाड्या हाताळण्याची क्षमता निर्माण झाली आहे. तरीही सिग्नल अथवा ऑपरेशनल कारणांमुळे काही गाड्या स्थानकाबाहेरच थांबतात. परिणामी, गाडी जळगावला वेळेत पोहोचूनही प्रवाशांना काही मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागते.
प्रवाशांची मागणी : गाडी थेट फलाटावर घ्या!
गाडी आऊटरवर थांबल्यानंतर काही प्रवासी घाईघाईने उतरून रुळ ओलांडण्याचा धोकादायक प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
आधुनिक स्थानकाची पूर्ण क्षमता वापरून शक्य तितक्या गाड्या थेट फलाटावर घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. आऊटरवरील अनावश्यक थांबे कमी झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल आणि रुळ ओलांडण्यासारख्या धोकादायक प्रकारांनाही आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील प्रवासाचे नियोजनही कोलमडते
गाडी आऊटरवर थांबल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो. अनेक प्रवाशांना जळगाव स्थानकाबाहेरून बस, रिक्षा किंवा अन्य वाहने पकडून पुढील प्रवास करायचा असतो. मात्र, गाडी उशिराने फलाटावर आल्याने त्यांचे नियोजन कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागतो.
सुविधा आहेत; पूर्ण क्षमतेने वापराची अपेक्षा
जळगाव स्थानकाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सहा फलाट, सरकते जिने, लिफ्ट, प्रशस्त प्रतीक्षालय आणि डिजिटल माहिती प्रणाली अशा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थानकाची क्षमता वाढली असताना गाड्या शक्यतो फलाटावरच घेण्यात याव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
“सुरत मार्गावरील गाड्या अनेकदा निर्धारित वेळेच्या आधी जळगावला पोहोचतात. त्यावेळी मध्य रेल्वेच्या इतर गाड्या स्थानकात असतात. त्या गाड्या वेळेत आल्याने त्यांना प्रथम स्थानकात प्रवेश दिला जातो. सुरत मार्गावरील गाडीची वेळ झाल्यानंतर तिलाही तातडीने फलाटावर घेण्यात येते. क्वचितच तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा होऊ शकतो; मात्र शक्यतो असे होत नाही. प्रवाशांनी गाडी फलाटावर आल्यानंतरच गाडीतून उतरावे. कोणताही धोका पत्करू नये आणि सुरक्षित प्रवास करावा.





