
जळगाव जिल्ह्यात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; ७ हजार चालकांवर कारवाई, ५२ लाखांचा दंड वसूल
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये; विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीट चालकांना दणका
विशेष प्रतिनिधी जळगाव : आगामी ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सव या सण-उत्सवांच्या काळात शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच अपघातांना आळा बसावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा पोलीस दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाने मिळून एकूण ७ हजार १०५ प्रकरणांमध्ये कारवाई करत ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत तपासणी
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार या मोहिमेत थेट रस्त्यावर उतरले होते. विशेषतः सकाळी, सायंकाळी आणि रात्री ११ वाजेपर्यंत प्रमुख रस्ते व चौकांत तपासणीवर भर देण्यात आला.
या मोहिमेदरम्यान विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, अतिवेगाने वाहन चालवणे, अवैध पार्किंग, मद्यपान करून वाहन चालवणे, अल्पवयीन चालक, सिग्नल उल्लंघन, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग, मॉडिफाइड सायलेन्सर आणि विनापरवाना शालेय वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कारवाईची आकडेवारी एका नजरेत
-
जिल्हा पोलीस दल: ५,६७० प्रकरणांमध्ये ३९ लाख ७० हजार १५० रुपयांचा दंड.
-
महामार्ग सुरक्षा पथक: १,४३५ प्रकरणांमध्ये १२ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा दंड.
-
विनाहेल्मेट कारवाई: सर्वाधिक ८५३ प्रकरणे.
-
इतर प्रमुख कारवाई: ट्रिपल सीट (५५९), बेकायदेशीर पार्किंग (५४१), शाळा-महाविद्यालय परिसर (१९७), मोबाईलचा वापर (१२०) आणि विनापरवाना शालेय वाहतूक (११२).
सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन
सणांचा आनंद घेताना नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, मद्यपान करून किंवा अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीत ही मोहीम राबवण्यात आली.





