

मारहाण प्रकरणात पोलीस शिपाई अनिल तायडे यांना अटक
उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
जळगाव | प्रतिनिधी : मारहाण प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई अनिल तायडे (ब.क्र. १३८७) यांनी उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रविवारी स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात अनिल तायडे यांच्यासह सागर तायडे आणि माया तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
यावल पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९१/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०९(१), १८९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च २०२६ रोजी अट्रावल गावात घडली होती.
फिर्यादी विजया तायडे (६०) आणि आरोपी हे नातेवाईक असून, ग्रामसभा सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून पोलीस शिपाई अनिल तायडे यांच्या पत्नी आणि फिर्यादी यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच वादातून घटनेच्या दिवशी अनिल तायडे यांनी फिर्यादीला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून त्यांना तसेच त्यांची मुलगी आरती हिला मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीत आरती हिला लोखंडी रॉडने मार लागल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपींविरुद्ध ३० जुलै २०२६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलीस शिपाई अनिल तायडे यांना अटक करून BNSS कलम १९३ अन्वये पूरक दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अनिल तायडे फरार होते.
२३ ऑगस्ट २०२६ रोजी उच्च न्यायालयाने अनिल तायडे यांचा जामीन अर्ज फेटाळला. गुन्ह्यातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी स्वतः यावल पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणानंतर पोलीस शिपाई अनिल तायडे यांना ३१ मार्च २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्याच दिवशी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. २८ जून २०२६ रोजी प्राथमिक चौकशीचा अहवाल (PE) सादर करण्यात आला. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२६ रोजी दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची विभागीय कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.




