खान्देशगुन्हेजळगांव

जामठीत अल्पवयीन मुलीशी शिक्षकाचे गैरवर्तन; संतप्त जमावाकडून कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

 जामठीत अल्पवयीन मुलीशी शिक्षकाचे गैरवर्तन; संतप्त जमावाकडून कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून सौम्य लाठीमार, गावात तणावानंतर शांतता

जळगाव (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यातील जामठी येथे खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करून अयोग्य मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संशयित शिक्षकाची कार पेटवून दिली. तसेच संशयिताला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांना घेराव घातला. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.

संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे समोर आल्यानंतर जामठी परिसरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेकडो नागरिक संशयित शिक्षकाच्या घराकडे जमा झाले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले.

कार पेटवली; आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी

संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतरही जमावाचा रोष शांत झाला नाही. संतप्त नागरिकांनी शिक्षकाच्या घरासमोर उभी असलेली कार पेटवून दिली. त्यानंतर संशयिताला पोलिसांच्या वाहनातून खाली उतरवून जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांनी संशयिताला सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली.

अश्रुधुरानंतर सौम्य लाठीमार

दगडफेक वाढल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, जमाव पांगण्यास तयार नसल्याने पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर जमाव हळूहळू पांगला.

एसपी श्रीकांत धिवरे यांच्यासह मोठा बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त जामठी गावात दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या गावातील वातावरण शांत असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी संशयित शिक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, बोदवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button