इतर

चिमुकल्या हातांनी साकारला गणराया; रोझलँडमध्ये सामाजिक गणेशोत्सवाचा संदेश

चिमुकल्या हातांनी साकारला गणराया; रोझलँडमध्ये सामाजिक गणेशोत्सवाचा संदेश

जळगाव : रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिर येथे शनिवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी एकदिवसीय गणेशोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रा. स्मिता जयकर यांच्या हस्ते विधिवत गणरायांची स्थापना करण्यात आली.

या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाल विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी मातीच्या लहान लहान गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत अत्यंत उत्साहाने गणरायाच्या मूर्ती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेसोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाला दिलेले सामाजिक व सार्वजनिक स्वरूप आणि त्यामागील उद्देश याविषयी माहिती देण्यात आली. इ.स. १८९३ च्या सुमारास लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक व संघटित स्वरूप देऊन समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे तसेच राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे कार्य केले, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

गणरायाच्या आगमनाने शाळेच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले.
‘चिमुकल्या हातांनी घडवला गणराया, मनामनांत जागवली सामाजिक एकतेची भावना’ अशा सुंदर संदेशातून हा एकदिवसीय गणेशोत्सव उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button