

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय मावशीचा खून करून मृतदेह चारीत फेकला
दागिन्यांच्या हव्यासातून हत्या; ४० दिवसांच्या अथक तपासानंतर एलसीबीकडून संशयित अटकेत, कानळदा फाट्याजवळ मृतदेह हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अपहरण व खून प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांच्या सलग तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. वैजंताबाई गणपत माळी यांचा त्यांच्याच सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याने दागिन्यांच्या हव्यासातून खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी प्रशांत माळी याला अटक केली असून, त्याच्या जबाबानुसार जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळ सहिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीतून मृतदेहाचे अवशेष हस्तगत करण्यात आले आहेत.
३ ऑगस्टला बेपत्ता झाल्या होत्या
३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता करंजी बु. येथे एकट्या राहणाऱ्या वैजंताबाई माळी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. नातेवाइकांच्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात सुरुवातीला मिसिंगची नोंद करण्यात आली. त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एलसीबीकडून समांतर तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपीचा शोध आणि बेपत्ता महिलेचा शोध या दोन्ही बाजूंनी तपास सुरू केला.
तपास पथकांनी पारोळा, करंजे, धरणगाव, अमळनेर, मुकटी, फागणे, धुळे, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल ते जळगाव अशा विस्तृत परिसरात शोध घेतला. सुमारे २५० किलोमीटरच्या परिसरात तपास करताना तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
सीसीटीव्हीने दिला महत्त्वाचा धागा
सीसीटीव्ही फुटेज तपासताना ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.१६ वाजता प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना दिसून आला. त्यानंतर काही वेळाने वैजंताबाई एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पारोळ्याच्या दिशेने जाताना दिसल्या. या फुटेजमुळे पोलिसांचा संशय प्रशांत माळी याच्यावर बळावला.
४० दिवसांच्या तपासानंतर आरोपी ताब्यात
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीने प्रशांत माळीचा शोध सुरू ठेवला. अखेर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रशांतने पोलिसांच्या तपासासमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या तपासानुसार, प्रशांतवर मोठ्या प्रमाणात कर्ज व आर्थिक देणी होती. त्याने यापूर्वी मावशीकडून पैसे घेतले होते. मात्र, आणखी पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर तसेच त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासातून त्याने हा कट रचल्याचे तपासात समोर आले.
३ ऑगस्ट रोजी शिरसोली येथे एका नातेवाइकाचा मृत्यू झाला असून अंत्यविधीसाठी जायचे आहे, असे खोटे कारण प्रशांतने वैजंताबाईंना सांगितले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या कारमधून (एमएच १९ ए ००७१) त्यांना सोबत नेले.
दिवसभर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात कारमधून फिरताना त्याने वैजंताबाईंकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र, त्यांनी दागिने देण्यास स्पष्ट नकार दिला.
हायवेवर गळा आवळून खून
४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता धुळे परिसरातील नांदराले फाट्याजवळ हायवेवर कार थांबवून प्रशांतने रुमालाने गळा आवळून वैजंताबाईंचा खून केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
खून केल्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो मुकटी येथील घरी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळ सहिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकून दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
४० दिवसांनी मृतदेहाचा शोध
प्रशांत माळीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कानळदा फाट्याजवळ शोधमोहीम राबवली. त्यावेळी सिमेंटच्या चारीत कुजलेले मानवी अवशेष व सांगाडा आढळून आला. त्यामुळे ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वैजंताबाई माळी यांच्या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण उलगडा झाला आहे.
दागिने विकल्याची कबुली
प्रशांतने वैजंताबाईंचे काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. उर्वरित दागिने फागणे, धुळे परिसरात लपवून ठेवल्याचेही त्याने सांगितले आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.
संयुक्त पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वाल्टे, संतोष पवार यांच्यासह पथकाने तपास केला. तांत्रिक विश्लेषणात पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकले यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही तपासात सहभाग घेतला.




