
फैजपूर नगरपरिषदेच्या जुन्या व्यापारी संकुलातील १६ दुकानांचा मुद्दा ऐरणीवर
नगरसेविका सुमय्याबी शेख कुरबान यांचे चौकशीसह थकीत भाडे वसुलीची मागणी
फैजपूर | प्रतिनिधी
फैजपूर नगरपरिषदेच्या आ. क्र. २७ मधील जुने मौलाना आझाद व्यापारी संकुल येथील १६ दुकानांच्या जागेच्या वापराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या दुकानांच्या भाडेपट्ट्याच्या अटी, थकीत भाडे, कथित अतिक्रमण तसेच नगरपरिषद मालमत्तेच्या वापराबाबत चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सुमय्याबी शेख कुरबान यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ८ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या संदर्भात जुन्या मौलाना आझाद व्यापारी संकुलावरील १६ दुकानांवरील गच्ची भाड्याने देण्याबाबत निर्णय झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर संबंधित जागा काही अटी व शर्तींच्या अधीन राहून देवेंद्र इच्छाराम साळी व इतरांना देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या अटी व शर्तींचा भंग झाल्याने संबंधित जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी काही भाग तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी काढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित ठराव रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा नगरसेविका कुरबान यांनी केला आहे.
मात्र, गेल्या ११ वर्षांपासून संबंधित दुकाने वापरात असल्याचे नमूद करत या कालावधीतील थकीत भाडे वसूल करून दुकाने नगरपरिषदेने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपरिषदेने काही व्यापारी संकुलातील दुकानधारकांना तीन ते चार पट भाडेवाढीच्या नोटिसा दिल्या असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. दुसरीकडे आ. क्र. २७ मधील दुकानधारकांबाबत नगरपरिषदेकडून वेगळी भूमिका का घेतली जात आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संबंधित जागेवर नगरपरिषदेच्या एका नगरसेवकाच्या नावाने इलेक्ट्रिक दुकान सुरू असल्याचे समजते, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दुकानधारकाकडून नियमानुसार भाडे वसूल करावे आणि दुकाने नगरपरिषदेने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित जागेवर नगरसेवकाचा व्यवसाय सुरू असल्यामुळे अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळत असल्याचे आढळल्यास, संबंधित नगरसेवकाविरुद्ध नियमानुसार अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशी मागणी नगरसेविका कुरबान यांनी केली आहे. या प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही मार्गाने तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
या निवेदनामुळे फैजपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील दुकाने, भाडे वसुली, अतिक्रमण आणि नगरसेवकाच्या कथित व्यावसायिक वापराबाबत चौकशीची मागणी पुढे आली असून, नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.




