इतर

फैजपूर नगरपरिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड आणि ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी!

फैजपूर नगरपरिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड आणि ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी!

नगरसेविका सौ. सुमय्या शेख कुर्बान यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; ३० दिवसांत अंमलबजावणीचे आदेश काढण्याची मागणी*

फैजपूर प्रतिनिधी फैजपूर : नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी फैजपूर नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पदानुसार ड्रेसकोड आणि अधिकृत ओळखपत्र अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. सुमय्या शेख कुर्बान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनानुसार, नगरपरिषदेत कार्यरत असलेले शिपाई, सफाई कर्मचारी, लिपिक, विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ड्रेसकोड निश्चित करण्यात यावा. शिपाई व इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र गणवेश, तर अधिकारी व विभागप्रमुखांसाठी पदानुसार ड्रेसकोड लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र (आयडेंटिटी कार्ड) देण्यात यावे. कार्यालयीन वेळेत ते गळ्यात किंवा सहज दिसेल अशा ठिकाणी परिधान करणे बंधनकारक करण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयीन शिस्तीसह नागरिकांना मिळणार दिलासा!
ड्रेसकोड आणि ओळखपत्र अनिवार्य केल्यास नागरिकांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटविणे सोपे होईल. तसेच कार्यालयीन कामकाजात शिस्त राखण्यास, पारदर्शकता वाढविण्यास आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास मदत होईल, अशी भूमिका नगरसेविका सुमय्या शेख कुर्बान यांनी मांडली आहे.
या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन ड्रेसकोड व ओळखपत्राबाबत प्रशासकीय आदेश तातडीने निर्गमित करावेत. आदेश काढल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त ३० दिवसांची निश्चित मुदत देऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आता या निवेदनावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि ड्रेसकोड व ओळखपत्राच्या मागणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे फैजपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button