खान्देशजळगांव

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजविल्यास मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजविल्यास मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाचे आवाहन; शांतता क्षेत्रात फटाके वाजविण्यास बंदी

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळी सणादरम्यान ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजविण्यावर विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी रात्री १० वाजेनंतर फटाके वाजवू नयेत, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून दिवाळी सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक ७२/१९९८ मधील २७ सप्टेंबर २००१ च्या अंतरिम आदेशानुसार, ध्वनी व हवा प्रदूषणाचे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार पर्यावरण संरक्षण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा

फटाके वाजविण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजविण्यास मनाई आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील शांतता क्षेत्रात कोणत्याही वेळी फटाके वाजविण्यास परवानगी नाही.

आवाजाच्या मर्यादेचे पालन बंधनकारक

फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करण्यास बंदी आहे. तसेच साखळी फटाक्यांसाठी निर्धारित ध्वनी मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमबाह्य साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करता येणार नाही.

प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश

ध्वनी व हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत प्रसारमाध्यमांतून जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके आणि नियमबाह्य साखळी फटाके आढळल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.

अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्या

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे कोणतेही अपघात घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी फटाके वाजविताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. दिवाळीचा आनंद सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button