नातेवाईकांचा आक्रोश नियम तोडून वाहतूक केली जात असल्याचा आरोप
जळगाव l २२ जून २०२३ l भडगाव l प्रतिनिधी l तालुक्यातील पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ आज दिनांक 22 रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवकास पेट्रोल भरलेल्या वाहनाने
जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात युवकाचा मृत्यू झाला असून
पेट्रोल भरलेले ट्रॅकर पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ आज दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवक भावेश रामेश्वर पाटील वय २१ हा त्याचे मोटारसायकल क्र एम एच १९ डी झेड ०३६४ ने जात असताना त्यास पेट्रोल ने भरलेल्या ट्रॅकर एम एच ४१ ए जी ९४०२ ने जोरदार ठोस मारली. यात भावेश पाटील याचा मृत्यू झाला. त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
याबाबत मृताचे काका बापुराव विक्रम पाटील ( वय ५७, व्यवसाय शेती ) यांच्या फिर्यादी वरून पेट्रोल वाहन चालक दत्तू गंगाधर धानगे रा.भालूर ता नांदगाव यांचे विरूद्ध भादवी कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ मोटर अपघात कलम कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.
भावेश याने नुकताच भडगाव महाविद्यालय येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. शिक्षण घेऊन काही तरी करण्याची व बनण्याची त्याची इच्छा होती असे नातलग व मित्रांनी शोक व्यक्त करतांना सांगितले.
युवकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने घटने नंतर गावात व परिसरात एकच शोकमय वातावरण निर्माण झाले. तर रात्री भडगाव पोलीस स्टेशन येथे नातलगांनी दोषिस कडक शासन व्हावे व न्याय मिळावा म्हणून मागणी करत गर्दी केली.
यावेळी वाहन कागदपत्रे तपासा, नियम तोडून वाहतूक केली जात होती. वाहन सोडू नये आदी मागणी करत नातलग उशिरा पर्यंत पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करून होते.