निकषांनुसार पार पडल्या जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या बदल्या; पहिल्याच दिवशी २३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

निकषांनुसार पार पडल्या जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या बदल्या; पहिल्याच दिवशी २३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलिस दलात सहाय्यक उपनिरीक्षक ते शिपाई पदापर्यंतच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया नियोजित निकष व पसंतीक्रमानुसार राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी २३२ पोलीस कर्मचाऱ्यांची बदल्या करून त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मुख्यालय झाले रिकामे
बुधवारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, पोलीस मुख्यालयातील QRT आणि RCP विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत घेऊन बदली करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रात्री उशिरा आदेश जारी करत बदल्यांचे संकेत दिले. यामुळे मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी नव्या पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त झाले असून मुख्यालय आता जवळपास रिकामे झाले आहे.
एलसीबीसाठी अद्याप प्रतीक्षा
या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) अनेक कर्मचाऱ्यांची बदली झाली असली तरी कोणालाही पुन्हा एलसीबीमध्ये नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाखेत नियुक्तीची वाट पाहणाऱ्यांना ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागणार आहे. एलसीबीसाठी पुन्हा एकदा स्वतंत्र निकष ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विनंती बदल्यांचे अर्ज अजूनही प्रतीक्षायादीत
याच दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज सादर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत अशा कोणत्याही विनंती अर्जांची कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सध्या वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. यात मुक्ताईनगर आणि चाळीसगाव विभागातील अर्जदारांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे.
स्थगिती न देता बदल्या; निकषांना प्राधान्य
यंदा बदल्यांच्या प्रक्रियेत कोणालाही सरसकट स्थगिती न देता निकष व वैयक्तिक परिस्थितीनुसारच निर्णय घेण्यात आला. गंभीर आजार किंवा कौटुंबिक अडचणी असलेल्या काही कर्मचाऱ्यांना साईड ब्रँचमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
नाराजीचे सूरही
जरी बदल्यांचे बहुतांश निर्णय निकषांनुसार पार पडले असले तरी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या पसंतीशिवाय वा निकष बाजूला ठेवून झाल्याचा आरोप करत काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान यंदाची पोलीस बदली प्रक्रिया पारदर्शकतेच्या दिशेने एक पाऊल असल्याचे चित्र आहे, मात्र विनंती बदल्या आणि एलसीबीसारख्या शाखांसाठी अद्याप अनिश्चितता कायम आहे.