MPCB ची कारवाई : ‘सोया सिस्टीम लिमिटेड’ला थेट बंद करण्याची नोटीस

MPCB ची कारवाई : ‘सोया सिस्टीम लिमिटेड’ला थेट बंद करण्याची नोटीस
जळगाव (प्रतिनिधी) :MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD (MPCB) ने जळगाव एमआयडीसीतील सोया सिस्टीम लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई करत उत्पादन थांबवण्याची थेट नोटीस बजावली आहे. नियमांची पायमल्ली करून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कंपनीकडून उत्पादन सुरू ठेवण्यात आल्याचे समोर आल्याने MPCB ने कठोर पावले उचलली आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने बॅटरी उत्पादनातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा बसवलेल्या नव्हत्या. याशिवाय, त्यांनी कोणतीही अधिकृत नोंदणी अथवा परवानगी न घेता उत्पादन सुरू ठेवले होते. त्यामुळे या कंपनीकडून पर्यावरणविषयक गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतर कंपन्याही रडारवर
सोया सिस्टीम लिमिटेड प्रकरणासोबतच जळगाव एमआयडीसीतील अन्य अनेक कंपन्याही MPCB च्या रडारवर आहेत. सध्या विभागाकडून सुरू असलेल्या धडक तपासणी मोहिमेमध्ये परवाना नसलेल्या युनिट्स, सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या आणि ध्वनी-हवाप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात येत आहे.
“नियमानुसार व्यवसाय करा, अन्यथा बंद” – MPCB
MPCB च्या अधिकाऱ्यांनी सर्व कारखानदारांना इशारा दिला आहे की, पर्यावरण नियमांचे पालन न करणाऱ्या युनिट्सवर उत्पादन थांबवण्याची किंवा कंपनी सील करण्याची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे मंडळाचे स्पष्ट मत आहे.