
सावदा नगरपरिषदेला दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर
नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाही
सावदा | प्रतिनिधी
सावदा शहरातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रखडलेल्या विकासकामांना आता निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी सावदा नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा केला.
नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सावदा नगरपरिषदेसाठी या योजनेचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून निधी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, सावदा नगरपरिषदेला या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी निधी अनुज्ञेय करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष निधीचे वितरण झाले नसल्याचे नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. दलित वस्ती भागातील प्रस्तावित विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी केली होती.
या पाठपुराव्यानंतर संबंधित निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निधी मंजूर झाल्याने सावदा शहरातील दलित वस्ती भागातील प्रस्तावित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निधी मंजुरीचे निवेदन सादर करताना नगराध्यक्षा सौ. रेणुका ताई पाटील यांच्यासह नगरसेवक सचिन बऱ्हाटे, नगरसेवक नकुल बेंडाळे आणि सागर पाटील उपस्थित होते.
सावदा येथे दलित वस्ती सुधार योजना रखडली होती. या विषयाची माहिती देताना नगरसेवक विशाल तायडे यांनीही योजनेचा निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. नगरपरिषदेच्या पाठपुराव्यामुळे अखेर या निधीला मंजुरी मिळाल्याने शहरातील संबंधित वस्तीतील विकासकामांना चालना मिळणार आहे.



