
पूर्णा नदीत अवैधरीतल्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त
मुक्ताईनगर तहसीलदरांची कारवाई
मुक्ताईनगर प्रतिनिधी कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून तहसीलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी चार डंपर जप्त करण्यात आले. या कारवाईने वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून बुलढाणा जिल्हयातील हे चार डंपर असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तहसीलदार गिरीश वखारे यांनी महसूल पथक घटनास्थळी रवाना केले. कुऱ्हा-मलकापूर रस्त्यावरील धुपेश्वर पुलाजवळ पिंप्राळा शिवारात वाळू उपसा सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पथक पोहोचताच दनपर चालकांनी वाहने सोडून पळ काढला. चारही डंपर मलकापूर तालुक्यातील असल्याचे उघड झाले.
याठिकाणी कारवाई झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोकॉ सागर सावे, अंकुश बावस्कर, सुनील मोरे, मंगेश सुरळकर यांनी प्रयत्न केले.
“अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी नियमित धाडसत्र सुरू राहील. माफियांना शेतातून मार्ग देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर महसुली बोजा टाकू; पूर्वीच बोजा असलेल्या जमिनी सरकारजमा करू,” असा कठोर इशारा तहसीलदार वखारे यांनी दिला.
या कारवाईचे कुऱ्हा, थेरोळा, रिगाव, पिंप्राळा, कोहाळा, बोदवड, काकोडा परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. अवैध साठे नष्ट करा, रात्रीची तस्करी थांबवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





