इतर

दारूच्या नशेत वारंवार त्रास देणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने केला गळा आवळून खून 

दारूच्या नशेत वारंवार त्रास देणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने केला गळा आवळून खून 

जळगाव : दारुच्या नशेत वारंवार पत्नी व कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५८) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी त्यांची पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला भरत पाटील यांचा मृत्यू पलंगावरून पडल्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनादरम्यान मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला.
भरत पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. पत्नी शहरातील एका कापड दुकानात काम करत होती, तर दोन्ही मुले एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला आहेत. भरत पाटील यांना दारुचे व्यसन होते आणि ते वारंवार कुटुंबीयांसोबत वाद घालत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मंगळवारी रात्री मनिषा पाटील कामावरून घरी आल्यानंतर भरत पाटील हे दारुच्या नशेत होते. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. गळा आवळल्यानंतर भरत पाटील हे पलंगावरून खाली पडले. डोक्याला जबर मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्यांच्या कान व नाकातून रक्तस्राव सुरू झाला.
परिसरातील एका तरुणाने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली असता गळा आवळल्याचा संशय बळावला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद बदलून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मनिषा पाटील यांची चौकशी केली असता, पतीच्या सततच्या मानसिक आणि कौटुंबिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, भरत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत राहते घर विक्रीचा व्यवहार केल्याने कुटुंबात मोठे वाद निर्माण झाले होते. या सततच्या वादातूनच ही घटना घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button