
स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी फोडून एक लाखची रोकड लंपास
चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोड परिसरातील साने गुरुजी नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत दानपेटी फोडून सुमारे एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना ७ मे रोजी रात्री १०.३० ते ८ मे रोजी पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी आनंदराव राजाराम भोसले (वय ८२, रा. चाळीसगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडले आणि त्यातील अंदाजे एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनेची माहिती घेतली असून पोलीस निरीक्षक अमितकुमार मने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोहेकाॅं. योगेश मांडोळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





