खान्देशगुन्हेजळगांव

बोदवड पोलिस ठाण्यात मोठी कारवाई; हत्या प्रकरणानंतर तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन

बोदवड पोलिस ठाण्यात मोठी कारवाई; हत्या प्रकरणानंतर तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन

कायदा व सुव्यवस्था राखण्यात हलगर्जीपणा; वेळेत प्रतिबंधक कारवाई न केल्याचा ठपका

बोदवड : तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर बोदवड पोलिस ठाण्यात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, गंभीर निष्काळजीपणा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याच्या आरोपांवरून तीन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) दिपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ मे २०२६ रोजी बोदवड पोलिस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक ००९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी आणि विरोधी पक्षामध्ये गंभीर वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर अदाखल गुन्हा क्रमांक ०२८०/२०२६ देखील नोंदविण्यात आला होता.

या दोन्ही पक्षांतील वाढत्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांनी दोन्ही बाजूंची पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता कोणतीही सखोल चौकशी किंवा प्रतिबंधक कारवाई केली नाही. परिणामी दोन्ही पक्षांतील वाद अधिक चिघळत गेला आणि अखेरीस खुनासारखा गंभीर प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

दरम्यान, एएसआय रविंद्र गुरचळ हे बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत होते. १९ मे २०२६ रोजी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते पोलिस कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले होते. टाऊन बिट प्रभारी म्हणून त्यांना दोन्ही गटांतील वाढत्या वैमनस्याची पूर्ण कल्पना होती. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांवर जागेवरच किंवा पोलिस ठाण्यात आणल्यानंतर योग्य ती कायदेशीर व प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी दोन्ही पक्षांना केवळ पोलिस ठाण्यात आणून कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे २१ मे २०२६ रोजी खुनाचा गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी API दिपक सुरवडकर यांच्याविरोधातही गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरात दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वादाची माहिती पोलिस कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांनी त्यांना फोन तसेच व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. यामध्ये संबंधित पक्षांची नावे आणि परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करण्यात आले होते. याशिवाय स्थानिक नगरसेवकांनीही सुरवडकर यांना फोन करून संवेदनशील परिस्थितीची कल्पना दिली होती.

मात्र, इतकी गंभीर माहिती मिळूनही API सुरवडकर यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही. तसेच अधीनस्थ कर्मचाऱ्यांना कायदेशीर किंवा प्रतिबंधक कारवाईचे आदेशही दिले गेले नाहीत. वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचे विभागीय चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तिन्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, पुढील विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button