
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग; पाचोर्यात दिवसा ढवळ्या जबरी चोरी
२४ तासांत गुन्ह्याची उकल; तीन आरोपी जेरबंद, रोख रक्कम व बनावट पिस्तूल जप्त
पाचोरा : अमेझॉन डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून घरात घुसून महिलेसह तिच्या मुलांना धमकावत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद करत गुन्ह्याची उकल केली आहे. या कारवाईत चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
१२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी पाचोरा येथील लक्ष्मी आंगण कॉलनी परिसरातील कुसुम एकनाथ मोकळे यांच्या घरी अमेझॉनचे पार्सल आणल्याचे सांगून प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर आरोपींनी फिर्यादी महिला, तिच्या दोन मुली आणि मुलाला एका ठिकाणी बसवून सोन्याच्या चिपांची मागणी केली. “सोन्याच्या चिपा काढून द्या, अन्यथा परिणाम वाईट होतील,” अशी धमकी देत त्यांनी पिस्तूलाचा धाक दाखविला.
त्यानंतर आरोपींनी घरातील कपाटांची झडती घेत कपडे अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटात ठेवलेले ७ हजार रुपये तसेच मुलाकडील ७०० रुपये असा एकूण ७,७०० रुपयांचा ऐवज लंपास करून पलायन केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना १३ जून रोजी मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू भुतेकर (वय २१, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) याचाही सहभाग उघड झाला. तसेच आरोपी योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, नाशिक) याच्याकडून चोरीची ७,७०० रुपयांची रक्कम व गुन्ह्यात वापरलेले बनावट खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान फिर्यादीच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती गोकुळ वाघ याला मिळाली होती. त्याने ही माहिती नितीन पाटील याला दिली. त्यानंतर नितीन पाटीलने आपल्या परिचयातील व्यक्तींना बोलावून आरोपींशी संपर्क साधला आणि चोरीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोकुळ वाघ आणि नितीन पाटील यांनी आरोपींना जबरी चोरी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील तसेच योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.





