
जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; गुजरात मधील चोरीची ‘किया’ कार जप्त
अजिंठा चौफुलीवर कारचा पाठलाग करून चालकाला घेतले ताब्यात; ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव: अहमदाबाद ग्रामीण मधील बोपल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली ९ लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची किया कॅरेन्स कार जळगाव शहरात जप्त करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे ही कामगिरी फत्ते झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १५ एप्रिल २०२६ रोजी अहमदाबाद येथून किया कार (क्र. MP 04 ZL-5155) चोरी झाली होती. सदर कार १८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजता नशिराबाद टोल नाका पार करून जळगावकडे येत असल्याची गोपनीय माहिती गुजरात पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेवरून काशिनाथ चौकात नाकाबंदी लावण्यात आली.
सायंकाळी ७:१५ च्या सुमारास नाकाबंदी पाहून कार चालकाने तेथून पळ काढला.
यावेळी नाकाबंदीवर तैनात असलेले पोलीस अंमलदार रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी कारचा पाठलाग करत अजिंठा चौफुलीवर हिरो होंडा शोरुमसमोर कारला यशस्वीरित्या अडवले.
कार व चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. १९ जून रोजी जळगावात पोहोचलेल्या बोपल पोलिसांच्या पथकाकडे सदर ९ लाख किमतीची कार व संशयित आरोपीला सुपूर्द करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे, पोकॉ अफजल बागवान यांनी केली.





