खान्देशगुन्हेजळगांव

पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनने चाळीसगाव हादरले; ४४ जण ताब्यात, ३९ लाखांच्या आलिशान गाड्या जप्त

पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनने चाळीसगाव हादरले; ४४ जण ताब्यात, ३९ लाखांच्या आलिशान गाड्या जप्त

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहर पोलीस हद्दीत बुधवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी गुन्हेगार आणि संशयितांविरोधात मोठी कारवाई केली. पहाटे २ ते सकाळी ७ वाजेदरम्यान पार पडलेल्या या धडक मोहिमेत ४० सराईत गुन्हेगारांसह एकूण ४४ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर तब्बल ३९ लाख रुपये किमतीच्या तीन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील ८० आरोपी व गुन्हेगारांची पडताळणी करत त्यांच्या घरांची झडती घेतली. यापैकी ४४ जणांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

ऑपरेशनदरम्यान शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्ट कलम ४/२५ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अंतर्गत संशयास्पद आढळलेल्या तीन आलिशान वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एमएच-२० ईजे-४८९० क्रमांकाची वॅगनार, एमएच-१४ ईपी-७३५८ क्रमांकाची ऑडी आणि एमएच-४३ एआर-३४०९ क्रमांकाची वरना कार अशा सुमारे ३९ लाख रुपये किमतीच्या वाहनांचा समावेश आहे.

याशिवाय आठ पकड वॉरंटची यशस्वी बजावणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत तीन प्रकरणांमध्ये कारवाई करून कच्चे रसायन नष्ट करण्यात आले, तर तीन जणांना समन्स बजावण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईत एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेची पथके आणि तीन आरसीपी पथकांचा सहभाग होता.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button