
मुस्लिम युवकांनी भाजपशी जोडावे; विकासासाठी संधीचा लाभ घ्यावा – वसीम खान
अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविण्याचा दावा; युवकांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबविण्यात येत असून, मुस्लिम समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने पक्षाशी जोडून विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जळगाव उपजिल्हाध्यक्ष वसीम खान यांनी केले आहे.
जळगाव शहरातील युवकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक क्षेत्रात कार्य करण्याची तसेच नेतृत्व विकसित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना व सुविधा राबविण्यात येत असल्याचा विश्वास वसीम खान यांनी व्यक्त केला.
तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश दामू भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि विकासाभिमुख राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहन वसीम खान यांनी केले. मुस्लिम समाजातील युवकांनी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी उपलब्ध संधींचा लाभ घेत भारतीय जनता पक्षाशी जोडावे, असेही त्यांनी नमूद केले.





