
जळगावात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची संघटना वाढीसाठी महत्त्वाची बैठक
जिल्हा प्रभारी सुनील भुसारा आणि रोहिणीताई खडसेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
जळगाव:आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कार्यालयात महानगर प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा प्रभारी सुनील भुसारा आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आगामी काळात संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या समस्या आणि अडचणी सोडवून पक्षाला जळगाव शहरात नवी उभारी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीदरम्यान जळगाव शहरातील पक्षाची सद्यस्थिती, प्रभागनिहाय संघटना वाढीसाठी उद्भवणारे प्रश्न आणि स्थानिक अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रभारी सुनील भुसारा यांनी पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेत, ते सोडविण्याच्या दृष्टीने उचित मार्गदर्शन केले व मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तर महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी महिला आघाडी मजबूत करण्यावर आणि पक्षाची ध्येयधोरणे घराघरांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष एजाजभाई मलिक, संग्रामसिंह सूर्यवंशी, सचिन पाटील, अशोक लाडवनजारी, मजहरभाई पठाण, सुनील माळी, रमेश पाटील, अन्वर खाटिक, विनायक पाटील, रिंकू चौधरी, किरण राजपूत, राजू मोरे, डॉ. राहुल उदासी यांच्यासह जळगाव महानगरचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभेच्या निकालानंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात शरद पवार गटाने सुरू केलेल्या या हालचाली अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.





