चार वर्षीय भाचीवरील अत्याचारप्रकरणी चुलत मामाला २० वर्षांची सक्तमजुरी

चार वर्षीय भाचीवरील अत्याचारप्रकरणी चुलत मामाला २० वर्षांची सक्तमजुरी
जळगाव न्यायालयाचा निकाल; पीडितेला १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी
चार वर्षीय भाचीला खेळण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत मामाला न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असून, दंडातून १५ हजार रुपये पीडित बालिकेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मध्यप्रदेशातील एक कुटुंब मजुरीसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्यारखेडा परिसरात वास्तव्यास आले होते. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता कुटुंबातील चार वर्षीय बालिकेला तिच्या चुलत मामाने खेळण्याचे आमिष दाखवून बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी १ जुलै २०२६ रोजी निकाल देत आरोपी चुलत मामाला दोषी ठरवून २० वर्षांची सक्तमजुरी, २० हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी अमोल पाटील तसेच केस वॉच म्हणून पोलीस निरीक्षक गुणवंत सोनवणे यांनी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.





