अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम; कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम; कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रलंबित कामांना द्यावी गती : सीईओ करिश्मा नायर
जळगाव | प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर होऊनही अपूर्ण राहिलेली घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, भुसावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील अपूर्ण घरकुलांचा कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ग्रामपंचायत अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी कुलदीप ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. जाधव, विस्तार अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
अडचणी दूर करून कामांना गती
अपूर्ण घरकुले पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत घरकुलासाठी मंजूर जागांवरील अतिक्रमणे हटविणे, प्रलंबित अडचणींचे निराकरण करणे तसेच लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
क्षेत्रभेटी व लाभार्थ्यांशी संवादावर भर
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित क्षेत्रभेटी देऊन लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. घरकुलांच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक
घरकुलांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी करिश्मा नायर स्वतः प्रत्येक तालुक्यात जाऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अशा बैठका पार पडल्या असून, उर्वरित तालुक्यांमध्येही लवकरच बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
‘एकही पात्र कुटुंब घराविना राहू नये’
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले प्रत्येक घरकुल वेळेत पूर्ण व्हावे आणि कोणतेही पात्र कुटुंब घराविना राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले.





