
जळगाव जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; ९८.९९ टक्के कामकाज पूर्ण
४.८७ लाख मतदारांचे गणनापत्रक अप्राप्त; ‘ASDD’ याद्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध
विशेष प्रतिनिधी जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ राबवला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील बीएलओ (BLO) मार्फत घरोघरी भेटी देण्याचे कामकाज ९८.९९ टक्के पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांच्या याद्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून मतदारांनी आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे.
४ लाख ८७ हजार मतदार अप्राप्त
जळगाव जिल्ह्यात एकूण ३५ लाख ५२ हजार १९९ मतदार आहेत. त्यापैकी बुधवारपर्यंत (१२ ऑगस्ट २०२६) ४ लाख ८७ हजार ३८९ (१३.७२ टक्के) मतदारांचे गणनापत्रक बीएलओंकडे अप्राप्त राहिलेले आहे. यामध्ये मुख्यतः स्थलांतरित, मयत, दुबार तसेच गैरहजर असणाऱ्या मतदारांचा समावेश आहे.
अशा मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय वर्गवारी करून ‘Absent, Shifted, Dead, and Duplicate’ (ASDD) यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी जळगाव जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ www.jalgaon.nic.in वर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांना ‘इएफ फॉर्म’ भरण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने सर्व मतदारांना याद्यांचे अवलोकन करण्याचे आवाहन केले आहे. जर एखाद्या पात्र मतदाराचे नाव चुकून किंवा माहितीअभावी या ASDD यादीत समाविष्ट झाले असेल, तर त्यांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयाशी संपर्क साधावा.
आपला ‘इएफ फॉर्म’ (EF Form) भरून दिल्यास मतदार यादीतील नाव अबाधित राहण्यास मदत होणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





