जळगाव ;- पत्नी माहेरी तर पती कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना जळगाव शहरातील द्रोपदीनगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण तीन लाख २४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, द्रोपदीनगरातील रहिवासी गणेश विलास निकम हे खासगी कंपनीत कामाला असून कंपनीच्या कामानिमित्त ते २ डिसेंबर रोजी अकोला येथे गेले होते. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी मुलाला घेवून धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी निकम यांचे बंद घरफोडून सव्वा तीन लाखाचा ऐवज चोरून नेला. मंगळवार, १२ डिसेंबर रोजी शेजारील अजय पाटील यांनी चोरीविषयी निकम यांना माहिती दिली. निकम यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधून घरी जाण्यास सांगितल.
बुधवार १३ डिसेंबर रोजी निकम हे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसले. कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. टीव्ही, सेटटॉप बॉक्सदेखील चोरट्यांनी लांबविला. कपाटातील दागिने, पैसे चोरीला गेले असून निकम यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल करीत आहेत.
पाच हजार रूपये किंमतीचा टीव्ही, १ हजार रूपये किंमतीचा सेटटॉपबॉक्स, प्रत्येकी ३० हजार रूपये किंमतीच्या तीन सोन्याच्या चैन, प्रत्येकी ३० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, ५० हजार रूपये किंमतीच्या १८ ग्रॅमच्या अंगठ्या, १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, १८ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.