नवी दिल्ली ;– निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणा केली नसली तरी केंद्रातील सत्तारूढ भाजपने १९५ उमेदवारांची आपली पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीनुसार अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वारासणीमधून, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढणार आहेत. ३४ केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेचे तिकीटदेण्यात आले असले तरी काही मंत्र्यांना उमेदवारी नाकारून भाजप नेतृत्वाने धक्का दिला आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराची घोषणाकरण्यात आलेली नाही.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यादी जाहीर करताना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठ्या बहुमतासह तिसऱ्यांदा सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. या यादीत १६ राज्ये आणि २ केंद्रशासित समावेश आहे. यामध्ये २७ एससी, १८ एससी, ५७ ओबीसी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत २८ महिला व ४७ युवा नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
भाजपने ३४ केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये राजनाथ सिंह (लखनौ), स्मृती इराणी (अमेठी), मनसुख मांडविया (पोरबंदर), सर्वानंद सोनोवाल (दिब्रूगढ़), ज्योतिरादित्य शिंदे (गुना), भूपेंद्र यादव (अलवर), राजीव चंद्रशेखर (तिरुअनंतपुरम) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून उमेदवारी देण्यात आली. मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी २०१९ साली ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल व अर्जुन मुंडा यांनाही भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील ५१ तर मध्य प्रदेशातील २९ पैकी २४, पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २० जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील मात्र एकाही मतदारसंघाचा समावेश नाही.
दिल्लीतील विद्यमान खासदार हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, परवेश वर्मा, रमेश बिधुडी यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज (नवी दिल्ली), कमलजीत सहरावत (पश्चिम दिल्ली), रामवीर सिंह बिधूडी (दक्षिण दिल्ली), प्रवीण खंडेलवाल (चांदणी चौक) आणि मनोज तिवारी (ईशान्य दिल्ली) यांना पक्षाने तिकीट दिले आहे. पूर्व दिल्लीतून विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी निवडणूक लढण्यास अनिच्छा दर्शवली असून या जागेवरील उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या मतदारसंघातून आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोदींनी या निवडणुकीत भाजपसाठी ३७० जागांचे लक्ष्य ठेवले असून एनडीए ४०० हुन अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आपल्या सर्व सभांमध्ये मोदी ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा देत आहेत. निवडणूक आयोगाकडून या महिन्यात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. एप्रिल-मे महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल.