आरटीओंना दिले निवेदन, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार
खान्देश टाइम्स न्यूज l १८ मार्च २०२४ l जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जळगावातील घटनेने पालक मन चिंतीत झाले असून जिल्ह्यात आणखी कुठे असे प्रकार झाले असावे किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर्सरी ते ५ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या दृष्टीने जळगावातील हेतल वाणी व कल्पिता पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मागण्यांच्या दृष्टीने त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात हजारो शाळा असून त्यात प्ले ग्रुप ते माध्यमिक शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षण घेतात. अनेक शाळा या गावाबाहेर असल्याने विद्यार्थी स्कूल व्हॅन किंवा रिक्षाद्वारे ये – जा करतात. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत व्हॅनमध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात हजारो विद्यार्थिनी रिक्षा, व्हॅनद्वारे शाळेत ये – जा करतात. त्यामुळे इतर कुणासोबत ही असा प्रकार झाला असावा किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजात अशी विकृती अनेक असू शकतात. नुकतेच समोर आलेल्या घटनेने सर्वच पालक चिंतीत असून समाजमन सुन्न झाले आहे. प्रत्येक पालकाच्या मनात असलेली भीती दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
चिमुकल्यांच्या पालक असलेल्या हेतल वाणी आणि कल्पिता पाटील यांनी निवेदनाव्दारे, जिल्ह्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या नर्सरी ते ५ वी वर्गातील प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीला शाळेत ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देण्यात यावे., विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक रिक्षा, स्कूल व्हॅन चालक – मालक यांची नोंद शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे असणे बंधनकारक करावे, स्कूल व्हॅन आणि रिक्षामध्ये शक्य असल्यास सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात यावा, स्कूल व्हॅन आणि रिक्षाला जीपीएस बसविणे सक्तीचे करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी योग्य विषयाला हात घातल्याचे सांगत महिला व बालविकास अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबत सूचित करण्याच्या सूचना केल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची भेट घेऊन निवेदन दिले असून त्यांनी देखील शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, निवेदन पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील देण्यात येणार आहे.