दहशत माजवण्याच्या उद्देशाने कट्टा बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

दहशत माजवण्याच्या उद्देशाने कट्टा बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरुण भिलाटी परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल संजय पवार (रा. मेहरुण भिलाटी) असे आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मंगळवारी (दि. २७ मे) विशाल पवार हा पाण्याच्या हौदाजवळ संशयास्पदरीत्या थांबलेला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीनंतर एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा गावठी लोखंडी कट्टा व मॅगझीन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी विशाल पवारविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पथकात सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि प्रदीप चवरे यांनी सहभाग घेतला.