खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज-सी.पी. राधाकृष्णन.

विद्यापीठाचा 33 वा दीक्षांत समारंभ उत्साहात

जळगाव  (प्रतिनिधी) ) उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ बुधवार दि. ८ जानेवारी रोजी उत्साहात  संपन्न झाला. या समारंभात अध्यक्षीय भाषण करतांना श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.एम.जगदीश कुमार यांचे दीक्षांत भाषण झाले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत आपण परिवर्तनाच्या युगाला प्रारंभ केला आहे. उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे सद्याचे प्रमाण २८.४ % असून सन २०३५ पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी, समाज आणि उद्योगांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन शिक्षण हे एक महत्वाचे साधन बनले आहे.

शिक्षक हा प्रतिभावान आणि चारित्र्यवान पिढी निर्माण करीत असतो. एक चांगला शिक्षक केवळ माहितीच देत नाही तर नवनिर्मिती, सृजनशिलता आणि संशोधनाचा मानसिकतेला प्रेरणा देत असतो. शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रूजवावीत असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ग्रामीण व आदिवासी भागात असूनही उत्तम प्रतीचे उच्च शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त  केला. विद्यापीठातील चार वर्षीय ऑनर्स डिग्री प्रोग्रॉम, ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॉम तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर, विद्यापीठातील इनोव्हेशन – इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.

पदवीधर विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा, पालक, शिक्षक यांचे योगदान विसरू नका. या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले असून बहिणाबाईंचा वारसा पुढे नेण्यात विद्यार्थिनींचा सहभाग सुवर्णपदकातील संख्या बघता अधिक दिसून येतो ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.

ीक्षांत भाषण :

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी आपल्या दीक्षांत भाषणात  भारताला सन २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्यासाठी पदवीधरांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असून आर्थिक कारणांमुळे शिक्षणात बाधा येवू नये यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समानता  तसेच सांस्कृतिक वारसा याबद्दल मांडलेल्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून हे शैक्षणिक धोरण राबविले जात आहे. भारतीय भाषा व भारतीय ज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून कौशल्याधारीत शिक्षण देण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे प्रा. जगदीश कुमार म्हणाले.  सन २०४७ पर्यंत भारताला महासत्ता करण्यासाठी एकत्रित काम करावे, भारतीय असल्याचा अभिमान बाळगा, आपल्यातील क्षमतांचा शोध घ्या आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य ओळखा असे आवाहन पदवीधरांना उद्देशून त्यांनी केले.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील होते. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान  विद्याशाखा, आणि डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. कुलपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी स्नातकांना उपदेश केला.

मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. कपील सिंघेल, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते  सुवर्णपदक देण्यात आलेत. त्यानंतर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. जगदीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.

या समारंभासाठी एकुण २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १०५५६ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४१२८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ५२७३ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २५५७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३६६, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १३२८, प्रताप महाविद्यालयाचे ७५९, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७९३ व आर.सी.पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च १४८ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले.यामध्ये ८७ विद्यार्थिनी व ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

            दीक्षांत समारंभ सुरु होण्यापूर्वी सकाळी विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते झाले.

यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एम. जगदीश कुमार यांच्यासह व्य.प. सदस्य तसेच विद्यापीठ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील आणि मान्यवर उपस्थिती होते. विद्यापीठास रुसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून २११ विद्यार्थिनी क्षमता  असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्र.४ चे बांधकाम करण्यात आले आहे.  या वसतिगृहाच्या बांधकामाकरीता ८ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला असून रुसा अंतर्गत ५ कोटी ७० लाख रुपये निधी प्राप्त झाला तर उर्वरित रक्कम विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून खर्च करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button