
भरदिवसा घरात शिरून अज्ञात चोरट्याने तरुणीचा लॅपटॉप लांबविला
जळगाव (प्रतिनिधी) – भरदिवसा घरात शिरून अज्ञात चोरट्याने साई संस्कार कॉलनीतील एका तरुणीचा लॅपटॉप लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
निकीता विनोद पाटील (वय २५, रा. साई संस्कार कॉलनी, जळगाव) या एका खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीस आहेत. नेहमीप्रमाणे २२ मे रोजी सकाळी त्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेल्या. वॉकहून परत आल्यानंतर ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना त्यांनी आपली लॅपटॉप बॅग नेहमीच्या ठिकाणी न दिसल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी घरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र बॅग आणि त्यात असलेला सुमारे १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप कुठेही सापडला नाही. घरात कुणीतरी अनधिकृतपणे प्रवेश करून चोरट्याने लॅपटॉप लंपास केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.