
आठवड्याच्या शेवटी सोने-चांदी दरात तेजी; पुढील आठवड्यात स्थिरतेची शक्यता
जळगाव l प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाले असून, आठवड्याच्या अखेरीस दरात पुन्हा तेजी दिसून आली. सोने तब्बल २३०० रुपयांनी तर चांदी २ हजार रुपयांनी वधारली. पुढील आठवड्यात दर स्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला (दि. १९ मे) सोने ९४ हजार रुपये प्रति तोळा होते. दुसऱ्याच दिवशी ते ९३,९०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, रशिया-युक्रेनमधील तणाव पुन्हा चिघळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले. शुक्रवारी (दि. २४ मे) सोने ९५,३०० रुपये (९९,१८९ रुपये ग्रॅम दराने) पर्यंत पोहोचले.
चांदीचाही काहीसा असाच प्रवास राहिला. आठवड्याच्या सुरुवातीला चांदी ९७ हजार रुपये प्रति किलो दराने होती. आठवड्याच्या शेवटी ती ९९ हजार रुपये दराने स्थिरावली. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार हे दर जैसे थे राहिले.
मे महिना ‘रोलर कोस्टर’ ठरला
मे महिन्यातील हा तिसरा आठवडा गुंतवणूकदारांसाठी संमिश्र ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे दरांमध्ये मोठे चढ-उतार पहायला मिळाले. जागतिक घडामोडी आणि राजकीय अस्थिरतेचा परिणाम सोने-चांदीवर स्पष्टपणे जाणवला.
पुढील आठवड्यात काय?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात ५०० ते १००० रुपयांपर्यंत घट किंवा स्थिरता राहण्याची शक्यता आहे. मात्र, चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय बाजारातील विश्लेषक आदित्य नवलखा यांनी व्यक्त केला आहे.